Abhang Remix

बुधवार, ऑक्टोबर १३, २०१०

 

अभंग आस्वाद - १९

तिर्थी धोंडा पाणी

तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥
मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥
तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥२॥
तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥

तिर्थाच्या ठिकाणी जाण्याची इतकी धडपड आपण करतो, आणि कळत नकळत लुटले जातो. तुकाराम म्हणतात, संतसंग हाच खरा सर्व भावनिक गरजांचा उतारा आहे. नाहीतर कोणीतरी म्हटलेच आहे ना की...
रांड़, सांड़, सीढ़ी, सन्यासी | इनसे बचे तो काशी ।

तुकारामांनी तर सांगितले आहे की पूजा करताना संतमंडळी घरी आली तर आधी त्यांचा सत्कार करावा आणि मग देवाची पूजा.

करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥
देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु.॥.
शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥२॥
तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥

लेबल: ,


posted by shantanu  # ९:५० AM

बुधवार, जून २४, २००९

 

अभंग आस्वाद - १६

नका मजपाशीं | वदो प्रपंचाचे विशीं

नका मजपाशीं | वदो प्रपंचाचे विशीं ||१||
आतां नाइकावी कानीं | मज देवाविण वाणी ||ध्रु.||
येऊनियां रूपा | कोण पाहे पुण्यपापा ||२||
मागे आजिवरी | जालें माप नेलें चोरी ||३||
सांडियेलीं पानें | पुढें पिका अवलोकन ||४||
पडों नेदी तुका | आड गुंपूं कांहीं चुका ||५||

प्रपंचाच्या गप्पांचा आणि गॉसिपचा अगदी वीट आला की लोकांना हात जोडून नम्रपणे विनंती करा की आता पुरे. मला आता यात रस नाही. भगवंताचे गूण तुम्हाला गाता येत असतील तर गा, नाहीतर गप्प बसा, माझे कान शिणवू नका, तुमचे चालू द्या. पण लोकांना एकटं करमत नाही, ते मलाही त्यांच्यात "सामील" करू पाहातात. त्यांचा हेतू काही वाईट नसतो, पण त्यांना काय माहिती मी आता त्यांच्यातला राहिलेलो नाही? माझा क्लास आता वेगळा आहे?

लेबल: ,


posted by shantanu  # ७:२३ PM

शुक्रवार, ऑगस्ट ०१, २००८

 

अभंग आस्वाद - १५

ऐसे संत जाले कळीं
ऐसे संत जाले कळीं। तोंडीं तमाखूची नळी ॥१॥
स्नानसंध्या बुडविली । पुढें भांग वोडवली ॥ध्रु.॥
भांगभुर्का हें साधन । पची पडे मद्यपान ॥२॥
तुका म्हणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥३॥

आम्ही संत म्हणजे आम्ही कोणी वेगळे वा मोठे असा आव आणणारे ते संत कसे असू शकतात? व्यसन केले पण ते पचवले म्हणून संतपदवी मिळत नाही. लोकसंग्रहाने देखील देव बनता येत नाही. लोकांना रोगमुक्त करून त्यांचा दुवा घेता येईल पण त्यांना देवाकडे नेता येणार नाही. ईश्वराशी जवळीक ही संतांची ओळख. सध्याच्या संतांचे लक्षण तुकारामांनी वर केलेच आहे!

लेबल: ,


posted by shantanu  # ८:३२ PM

रविवार, मे २५, २००८

 

अभंग आस्वाद - १४

हिरा ठेवितां ऐरणीं
हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥1॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥
मोहरा होय तोचि अंगें। सूत न जळे ज्याचे संगें ॥2॥
तुका ह्मणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥3॥

हिरा ऐरणीवर ठेवून त्याच्यावर घणाचे घाव घातल्यावरही जर तो फुटला नाही तरच त्याला मोल येते. खोट्या हिऱ्याचा चुरा होतो. संकटात माणसाची खरी पारख होते. क्रूषापासून येशू ख्रिस्तापर्यंत आणि मोहम्मदापासून ते तुकारामांपर्यंत सर्व संतांना जगाच्या विरोधाचा सामना करावा लागला. पण मोहरिला गुंडाळलेले सुत जसे जळत नाही, तसे ईश्वराशी जवळीक साधलेले हे संत सुखरूप राहतात.

लेबल: ,


posted by shantanu  # ६:५९ PM

रविवार, मे ०४, २००८

 

अभंग आस्वाद - १३

तुका म्हणे धन
धनवंतालागीं । सर्वमान्यता आहे जगीं ॥१॥
माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥ध्रु.॥
जव मोठा चाले धंदा । तंव बहिण म्हणे दादा ॥२॥
सदा शृंगारभूषणें । कांता लवे बहुमानें ॥३॥
तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥४॥

वित्त, सत्ता, प्रसिद्धी या सर्व बाबी माणसाला समाजात मान्यता मिळवून देतात. पण आपण ज्यांना आपले मानतो त्यांच्या बाबतीतही याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात हा वेदना देणारा अनुभव तुकाराम या अभंगातून सांगतात. कदाचित तो त्यांचा व्यक्तिगत अनुभवही असू शकेल. कारण सुरवातीला सुरळीत चाललेला त्यांचा व्यवसाय दुष्काळाने डबघाईस आणला होता. या अभंगातली शेवटची ओळ ज्याला कळली त्याला अध्यात्मात आणखी काही शिकण्यासारखे राहिलेले नाही असे खुशाल समजावे. ज्या पैशासाठी आपण येवढा आटापिटा करतो तो नशिबात असला तरच आणि तेवढाच मिळतो तोही कधी, कसा जाईल याचा नेम नाही.
लक्ष्मीस्तोय तरंगभंग चपलः
पाण्याच्या लाटेप्रमाणे चंचल असलेल्या लक्ष्मीचा काय भरवसा?

लेबल:


posted by shantanu  # ८:१७ AM

मंगळवार, डिसेंबर ०४, २००७

 

अभंग आस्वाद - ९

ढाल तलवारें गुंतले हे कर
ढालतलवारे गुंतले हे कर । ह्मणे जुंझणार कैसा जुंझे ॥1॥
पेटी पडदळे सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥
बैसविलें मला येणें अश्वावरी । धावूं पळूं तरी कैसा आतां ॥2॥
असोनि उपाय ह्मणे हे अपाय । ह्मणे हायहाय काय करूं ॥3॥
तुका ह्मणे हा तों स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥4॥

साध्य साधण्यासाठी साधनाचा उपयोग करून घ्यायला ते साधन कसे वापरायचे याचे तर ज्ञान पाहिजे ना? नाहीतर तुकाराम महाराजांनी वर सांगितलेली अवस्था व्हायची. मला एका हातात ढाल तर दुस-या हातात तलवार दिलीत, आता मी लढू कोणत्या हाताने? घोड्यावर बसविलेत? वा! आता युद्धाची धावपळ कशी करणार?
तुझे आहे तुजपाशी, हेच खरे नव्हे का? तुझे सत्त्व तुझ्याजवळ असले तर साध्य साधण्यासाठी लागणारे साधन सहज उभे करता येते. ही गोष्ट प्रभू रामचंद्रांच्या कथेवरून स्पष्ट होत नाही का? रावणाची लंका जिंकायची, त्यासाठी समुद्र चालत पार करायचा. इतक्या मोठ्या सैन्याशी वानरांच्या सहाय्याने लढायचे, हे सर्व काय सोपे होते? त्यासाठी लागणारी साधनसंपत्ती रामाने स्वतःच्या सत्त्वाच्या बळावर उभी केली.

विजेतव्या लङ्का चरणतरणीया जलनिधिः
विपक्षः पौलस्त्यो रणभुवि सहायाश्च कपयः।
तथाप्येको रामः सकलमवधीद्राक्षसकुलम्
क्रियासिद्धिः सत्वे भवति महतां नोपकरणे॥

लेबल:


posted by shantanu  # २:३४ PM

रविवार, ऑक्टोबर २१, २००७

 

अभंग आस्वाद - ८

अवघा तो शकुन

अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चरण ॥ १ ॥
येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥ध्रु.॥
संग हरिच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥
तुका म्हणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥३॥

मुहुर्ताचे मोल तुकाराम महाराजांना कमी करायचे नाही पण हरीभक्तांना सर्वच काळ शुभ व सगळ्याच दिशाही शुभ आहेत असे सांगुन त्यांनी मोठ्या कौशल्याने समाजातील बाह्य अवडंबर कमी केले. श्रद्धेवर आघात न करता भक्तिचाच उपयोग करून धर्मात शिरलेली गतानुगतिकता त्यांनी यशस्वीपणे कमी करून दाखवली व हेच वारकरी संप्रदायाचे सामुदायिक यश आहे असे मला वाटते.

लेबल: ,


posted by shantanu  # ४:४९ PM

शुक्रवार, जुलै २७, २००७

 

अभंग आस्वाद - ७

पंढरीची वारी आहे माझे घरीं
पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥1॥
व्रत एकादशी करीन उपवासी । गाईन अहर्निशी मुखीं नाम ॥2॥
नाम विठोबाचें घेईन मी वाचे । बीज कल्पांतींचें तुका ह्मणे ॥3॥

"आहे माझे घरी" म्हणजे पिढीजात आहे असे तुकारामांना म्हणायचे असावे. घरच्या परंपरांचा अभिमान आपल्यासारखाच त्यांनाही होताच म्हणायचा की! एकादशी व्रताचे महत्व संतांच्या साहित्यामुळे महाराष्ट्रात वाढले असे म्हणायला जागा आहे. एखाद्या गुंडाच्या नुसत्या नावावर कामे होतात असे म्हणतात (खरे खोटे ईश्वर जाणे). मग विठोबाच्या नामाने पारमार्थिक उन्नती का होऊ शकणार नाही?

लेबल: ,


posted by shantanu  # १२:०६ PM
 

अभंग आस्वाद - ६

मी भक्त तूं देव ऐसें करीं
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितीभाव । मी भक्त तूं देव ऐसें करीं ॥1॥
दावीं रूप मज गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ॥ध्रु.॥
पाहोनि श्रीमुख देईन आलिंगन । जीवें निंबलोण उतरीन ॥2॥
पुसतां सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥3॥
तुका ह्मणे यासी न लावीं उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥4॥

महाराष्ट्रातले बहुतेक सर्व संत द्वैत भक्तीवर विश्वास ठेवणारे होते. "मी भक्त, तू देव ऐसे करी" अशी मागणी करणे म्हणजे अद्वैतवाद्यांना कमीपणाचे वाटेल कदाचित. प्रियकर प्रेयसीच्या नात्यात असलेला गोडवा लग्नानंतर खतम होतो असे म्हणतात, तसे द्वैतातला गोडवा अद्वैतात खतम होईल ही भीती भक्ताला लागून राहिलेली असते. थोडक्यात, भक्त व भगवंत यांच्यातील मधुर संबंधांचा ठाव घेणारा हा अभंग आहे.

लेबल: ,


posted by shantanu  # ११:१६ AM

गुरुवार, जुलै २६, २००७

 

अभंग आस्वाद - ५

ऐसा विटेवर देव कोठे
उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे |
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे ||
ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे |
तुका म्हणे आम्हां अनाथा कारणें, पंढरी निर्माण केली देवे ||

असा कमरेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला देव जगात कोठेच नाही. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याची आठवण तमाम महाराष्ट्राला होणे अपरिहार्यच आहे. एकत्वाचा, भक्तिचा व मुख्य म्हणजे निर्वैरत्वाचा संदेश संतसाहित्यातून सांगितला गेला व तो वारीच्या माध्यमातून गावोगाव पोहोचला.

ते संतजन, ते हरिदास धन्य होत.

लेबल: ,


posted by shantanu  # ४:५७ PM

मंगळवार, जून १२, २००७

 

अभंग आस्वाद - ४

संताचे वचनीं मानितां विश्वास
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥1॥
न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥
बैसलिये ठायी म्हणता रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥2॥
संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥3॥
खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥4॥
तुका म्हणे देव जोडे याचसाटीं । आणिक ते आटी न लगे कांहीं ॥5॥

प्रत्येक ठिकाणी बुद्धिप्रामाण्यवाद काय करायचा? तुकारामादी संतांवर विश्वास ठेवायला काहीच खर्च येत नाही. मग एक चान्स तर घेऊन बघा की राव. तोटा तर काहीच नाही, झाला तर फायदाच! एक वाणी यापेक्षा चांगला सल्ला तो काय देणार? बसल्याजागी रामराम म्हणून पाहा, परनारी मातेसमान तर परद्रव्य विष्ठेसमान मानून पाहा, खरे बोलून तर पाहा देव मोफत जोडला जातो आपल्या आयुष्याशी कायमचा!

लेबल: ,


posted by shantanu  # ११:०० PM

रविवार, जून १०, २००७

 

अभंग आस्वाद - ३

करितां चिंतन विठोबाचें

न कळे तें कळों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥1॥
न दिसे तें दिसों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥
न बोलों तें बोलों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥2॥
न भेटे तें भेटों येईल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥3॥
अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर ह्मणतां वाचे ॥4॥
तुका ह्मणे आस जीव सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥5॥

विषयांचे चिंतन करून काय मिळते? द्रव्य, दारेचे चिंतन करून काय त्या गोष्टी मिळतात का? पण विठोबाचे चिंतन केल्यास मात्र तो प्रत्यक्ष भेटायला येतो असा विश्वास तुकाराम देतात. द्रौपदीला नाही का चिंतनमात्रे कृष्णाने वस्त्रे पुरवली? १००% निष्ठेने आपली आस विषयांकडून ईश्वराकडे वळवली तर भवसागर तरून जाल असे ते म्हणतात.

लेबल: ,


posted by shantanu  # १०:२४ AM

शनिवार, जून ०९, २००७

 

अभंग आस्वाद - २

फुटती तरुवर उष्णकाळमासीं
कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥1॥
बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥ध्रु.॥
फुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥2॥
तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥3॥
तुका ह्मणे ज्याचें नाम विश्वंभर । त्याचें निरंतर ध्यान करीं ॥4॥

या दीड वीत पोटाच्या काळजीने इतके हातघाईवर का येता बरे? जन्माला घातले तेव्हा देवाने दुधाची सोय केली होती की नाही? पशू, पक्ष्यांची काळजी देव करतोच की! मग माणूसच का इतका घाबरून राहतो बरं? उन्हाळ्यात कोणीही पाणी घालत नसताना झाडांना पालवी फुटते हा ईश्वराचा चमत्कारच आहे. विश्वंभराचे ध्यान करा, नाम घ्या आणि चिंतामुक्त व्हा हाच तुकारामांचा संदेश आहे.

लेबल: ,


posted by shantanu  # ९:५३ PM

शुक्रवार, मे ११, २००७

 

अभंग आस्वाद - १

सदैव तुह्मां अवघें आहे
सदैव तुह्मां अवघें आहे । हातपाय चालाया ॥1॥
मुखीं वाणी कानीं कीर्ती । डोळे मूर्ती देखाया ॥ध्रु.॥
अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥2॥
घरास आगि लावुनि जागा। न पळे तो गा वांचे ना ॥3॥
तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥4॥
आपल्याकडे काय नाही यापेक्षा आपल्याकडे काय आहे ते पाहावे. आणि त्याचा सत्कर्मासाठी उपयोग करावा.
इतर काही नसेल पण हात पाय तर आहेत ना? कान आहेत, डोळे आहेत. त्याचा उपयोग आपण कसा करतो? स्वार्थाकरता करण्यात काहीच वाईट नाही पण आपण तर त्याचा उपयोग इतरांना त्रास देण्यासाठी करतो. त्याऐवजी शरीराचा उपयोग ईश्वराकडे जाण्यासाठी का करू नये? सदैव याचा अर्थ'नेहमी' असा नसून तुम्ही सुदैवी आहात असा घ्यायचा आहे.
आपल्या हिताकरता आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. असेल हरी तर देईल खाटल्यावरी असे थोडेच होणार आहे?

लेबल: , ,


posted by shantanu  # ८:४० PM

Archives

जुलै 2004   ऑक्टोबर 2004   डिसेंबर 2005   जानेवारी 2006   मे 2007   जून 2007   जुलै 2007   ऑक्टोबर 2007   डिसेंबर 2007   फेब्रुवारी 2008   मे 2008   ऑगस्ट 2008   जून 2009   डिसेंबर 2009   एप्रिल 2010   ऑक्टोबर 2010   नोव्हेंबर 2014   एप्रिल 2015  

This page is powered by Blogger. Isn't yours?