मी भक्त तूं देव ऐसें करीं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितीभाव । मी भक्त तूं देव ऐसें करीं ॥1॥
दावीं रूप मज गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ॥ध्रु.॥
पाहोनि श्रीमुख देईन आलिंगन । जीवें निंबलोण उतरीन ॥2॥
पुसतां सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥3॥
तुका ह्मणे यासी न लावीं उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥4॥
महाराष्ट्रातले बहुतेक सर्व संत द्वैत भक्तीवर विश्वास ठेवणारे होते. "मी भक्त, तू देव ऐसे करी" अशी मागणी करणे म्हणजे अद्वैतवाद्यांना कमीपणाचे वाटेल कदाचित. प्रियकर प्रेयसीच्या नात्यात असलेला गोडवा लग्नानंतर खतम होतो असे म्हणतात, तसे द्वैतातला गोडवा अद्वैतात खतम होईल ही भीती भक्ताला लागून राहिलेली असते. थोडक्यात, भक्त व भगवंत यांच्यातील मधुर संबंधांचा ठाव घेणारा हा अभंग आहे.
लेबल: abhang, tukaram