Abhang Remix

सोमवार, एप्रिल ०६, २०१५

 

अभंग आस्वाद - २०

अमुचा कैवारी हनुमान

कैवारी हनुमान अमुचा        । कैवारी हनुमान       ॥१॥
पाठीस असतां जो जगजेठी  । वरकड काय गुमान  ॥२॥
नित्य निरंतर भजकां रक्षी    । धरुनियां अभिमान    ॥३॥
दासां रक्षिल हाचि भरवसा   । वदतो त्याची आण   ॥४॥

रामदास स्वामींचा हा अभंग.
ते म्हणतात हनुमंत आमचा कैवारी आहे! राम हा राजा होता आणि त्याचे काम होते न्याय करणे. काहींना रामापेक्षा हनुमंताची भक्ती जास्त प्रिय वाटते. का? तर हनुमान हा आपला कैवार घेईल असा भरवसा वाटतो. कैवार कोण घेतो? आई वडिल मुलाचा, मित्र मित्राचा तर प्रेयसी प्रियकराचा. कैवार घेणे म्हणजे चुकलेले असले तरी बाजू घेणे आणि संकटात साथ न सोडणे. या अर्थाने रामदास स्वामींनी हनुमंताला कैवारी म्हटले आहे ते खरेच असले पाहिजे !

posted by shantanu  # ७:३५ AM

रविवार, नोव्हेंबर ३०, २०१४

 

नाही म्हणायला शिका!

तुकारामाच्या पहिल्या ३०० अभंगातील शब्द मोजले तर "नाही" हा शब्द १६४ वेळा आला आहे. भौतिक सुखांना आणि मोहाला नाही म्हटल्याखेरीज आध्यात्मिक प्रगती होणार नाही असा तर याचा अर्थ नाही?

import urllib2
import nltk
response = urllib2.urlopen('http://tinyurl.com/mrtuka1')  
raw = response.read()
raw1 = raw.decode('utf-8')
tokens=nltk.word_tokenize(raw1)
myf=nltk.FreqDist(tokens)
ll=myf.most_common(20)

for i in ll:
    print "%s %s" % (i[0], i[1])

वर दिलेला पायथॉन कोड वापरल्यावर हा निष्कर्ष निघतो!

॥१॥ 306
॥२॥ 305
म्हणे 300
॥३॥ 292
तुका 292
॥ध्रु.॥ 257
नाहीं 164

लेबल: ,


posted by shantanu  # १:५२ PM

बुधवार, ऑक्टोबर १३, २०१०

 

अभंग आस्वाद - १९

तिर्थी धोंडा पाणी

तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥
मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥
तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥२॥
तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥

तिर्थाच्या ठिकाणी जाण्याची इतकी धडपड आपण करतो, आणि कळत नकळत लुटले जातो. तुकाराम म्हणतात, संतसंग हाच खरा सर्व भावनिक गरजांचा उतारा आहे. नाहीतर कोणीतरी म्हटलेच आहे ना की...
रांड़, सांड़, सीढ़ी, सन्यासी | इनसे बचे तो काशी ।

तुकारामांनी तर सांगितले आहे की पूजा करताना संतमंडळी घरी आली तर आधी त्यांचा सत्कार करावा आणि मग देवाची पूजा.

करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥
देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु.॥.
शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥२॥
तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥

लेबल: ,


posted by shantanu  # ९:५० AM

शुक्रवार, एप्रिल २३, २०१०

 

अभंग आस्वाद - १८

देव दयाळ
देव दयाळ देव दयाळ । साहे कोल्हाळ बहुतांचा ॥१॥
देव उदार देव उदार । थोड्यासाटीं फार देऊं जाणे ॥२॥
देव चांगला देव चांगला । तुका लागला चरणीं ॥३॥

देव आपल्यासारखा असावा म्हणजे त्याच्याशी संवाद साधता यावा ही मूर्तिपूजेची व भक्तिची मुख्य कल्पना. पण आपण आपल्या देवाला आपल्या 'लेवल'ला आणून ठेवले आहे. म्हणजे असे की आपल्याला दारू हवी म्हणून ती देवाला वाहायची आणि मग आपण घ्यायची! आपला अपमान झाला तर आपण सूडाच्या भावनेने पेटून उठतो मग देवही तसाच हवा ना? म्हणूनच प्रसाद न घेता पतीला भेटायला गेलेल्या कलावतीची सत्यनारायणाने केलेली हालत आपल्याला सुखावते. देव चांगला आहे, दिसायला आपल्यासारखा दिसला तरी गुणाने आपल्यासारखा नाही. त्याच्या चरणी लागलो तर आपणही थोडेफार तसे होऊ, नाही का?

लेबल:


posted by shantanu  # ७:१६ PM

रविवार, डिसेंबर २०, २००९

 

अभंग आस्वाद - १७

भक्तिभावें विण

आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी॥१॥
अंतरीं पापाच्या कोडी । वरिवरि बोडी डोईं दाढी ॥ध्रु.॥
बोडिलें तें निघालें । काय पालटलें सांग वहिलें ॥२॥
पाप गेल्याची काय खुण । नाहीं पालटले अवगुण ॥३॥
भक्तिभावें विण । तुका म्हणे अवघा सीण ॥४॥

आतमध्ये पापाचे थरच्या थर असताना केवळ वरच्या केसांचे मुंडन केल्याने काय होणार? अवगुणांची छाटणी होणे गरजेचे आहे. सिंहस्थ पर्वणी म्हणजे न्हावी आणि भटांचे कमाईचे दिवस! तर समाजातील दांभिकांना आपली शक्ती दाखविण्याची संधी. भक्तिभाव नसेल तर हा सगळा पसारा व्यर्थ आहे असे तुकाराम महाराज बजावतात.

लेबल:


posted by shantanu  # ३:१३ PM

बुधवार, जून २४, २००९

 

अभंग आस्वाद - १६

नका मजपाशीं | वदो प्रपंचाचे विशीं

नका मजपाशीं | वदो प्रपंचाचे विशीं ||१||
आतां नाइकावी कानीं | मज देवाविण वाणी ||ध्रु.||
येऊनियां रूपा | कोण पाहे पुण्यपापा ||२||
मागे आजिवरी | जालें माप नेलें चोरी ||३||
सांडियेलीं पानें | पुढें पिका अवलोकन ||४||
पडों नेदी तुका | आड गुंपूं कांहीं चुका ||५||

प्रपंचाच्या गप्पांचा आणि गॉसिपचा अगदी वीट आला की लोकांना हात जोडून नम्रपणे विनंती करा की आता पुरे. मला आता यात रस नाही. भगवंताचे गूण तुम्हाला गाता येत असतील तर गा, नाहीतर गप्प बसा, माझे कान शिणवू नका, तुमचे चालू द्या. पण लोकांना एकटं करमत नाही, ते मलाही त्यांच्यात "सामील" करू पाहातात. त्यांचा हेतू काही वाईट नसतो, पण त्यांना काय माहिती मी आता त्यांच्यातला राहिलेलो नाही? माझा क्लास आता वेगळा आहे?

लेबल: ,


posted by shantanu  # ७:२३ PM

शुक्रवार, ऑगस्ट ०१, २००८

 

अभंग आस्वाद - १५

ऐसे संत जाले कळीं
ऐसे संत जाले कळीं। तोंडीं तमाखूची नळी ॥१॥
स्नानसंध्या बुडविली । पुढें भांग वोडवली ॥ध्रु.॥
भांगभुर्का हें साधन । पची पडे मद्यपान ॥२॥
तुका म्हणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥३॥

आम्ही संत म्हणजे आम्ही कोणी वेगळे वा मोठे असा आव आणणारे ते संत कसे असू शकतात? व्यसन केले पण ते पचवले म्हणून संतपदवी मिळत नाही. लोकसंग्रहाने देखील देव बनता येत नाही. लोकांना रोगमुक्त करून त्यांचा दुवा घेता येईल पण त्यांना देवाकडे नेता येणार नाही. ईश्वराशी जवळीक ही संतांची ओळख. सध्याच्या संतांचे लक्षण तुकारामांनी वर केलेच आहे!

लेबल: ,


posted by shantanu  # ८:३२ PM

Archives

जुलै 2004   ऑक्टोबर 2004   डिसेंबर 2005   जानेवारी 2006   मे 2007   जून 2007   जुलै 2007   ऑक्टोबर 2007   डिसेंबर 2007   फेब्रुवारी 2008   मे 2008   ऑगस्ट 2008   जून 2009   डिसेंबर 2009   एप्रिल 2010   ऑक्टोबर 2010   नोव्हेंबर 2014   एप्रिल 2015  

This page is powered by Blogger. Isn't yours?