भक्तिभावें विणआली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी॥१॥
अंतरीं पापाच्या कोडी । वरिवरि बोडी डोईं दाढी ॥ध्रु.॥
बोडिलें तें निघालें । काय पालटलें सांग वहिलें ॥२॥
पाप गेल्याची काय खुण । नाहीं पालटले अवगुण ॥३॥
भक्तिभावें विण । तुका म्हणे अवघा सीण ॥४॥
आतमध्ये पापाचे थरच्या थर असताना केवळ वरच्या केसांचे मुंडन केल्याने काय होणार? अवगुणांची छाटणी होणे गरजेचे आहे. सिंहस्थ पर्वणी म्हणजे न्हावी आणि भटांचे कमाईचे दिवस! तर समाजातील दांभिकांना आपली शक्ती दाखविण्याची संधी. भक्तिभाव नसेल तर हा सगळा पसारा व्यर्थ आहे असे तुकाराम महाराज बजावतात.
लेबल: tukaram