अमुचा कैवारी हनुमान
कैवारी हनुमान अमुचा । कैवारी हनुमान ॥१॥
पाठीस असतां जो जगजेठी । वरकड काय गुमान ॥२॥
नित्य निरंतर भजकां रक्षी । धरुनियां अभिमान ॥३॥
दासां रक्षिल हाचि भरवसा । वदतो त्याची आण ॥४॥
रामदास स्वामींचा हा अभंग.
ते म्हणतात हनुमंत आमचा कैवारी आहे! राम हा राजा होता आणि त्याचे काम होते
न्याय करणे. काहींना रामापेक्षा हनुमंताची भक्ती जास्त प्रिय वाटते. का? तर
हनुमान हा आपला कैवार घेईल असा भरवसा वाटतो. कैवार कोण घेतो? आई वडिल
मुलाचा, मित्र मित्राचा तर प्रेयसी प्रियकराचा. कैवार घेणे म्हणजे चुकलेले
असले तरी बाजू घेणे आणि संकटात साथ न सोडणे. या अर्थाने रामदास स्वामींनी
हनुमंताला कैवारी म्हटले आहे ते खरेच असले पाहिजे !