फुटती तरुवर उष्णकाळमासीं कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥1॥
बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥ध्रु.॥
फुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥2॥
तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥3॥
तुका ह्मणे ज्याचें नाम विश्वंभर । त्याचें निरंतर ध्यान करीं ॥4॥
या दीड वीत पोटाच्या काळजीने इतके हातघाईवर का येता बरे? जन्माला घातले तेव्हा देवाने दुधाची सोय केली होती की नाही? पशू, पक्ष्यांची काळजी देव करतोच की! मग माणूसच का इतका घाबरून राहतो बरं? उन्हाळ्यात कोणीही पाणी घालत नसताना झाडांना पालवी फुटते हा ईश्वराचा चमत्कारच आहे. विश्वंभराचे ध्यान करा, नाम घ्या आणि चिंतामुक्त व्हा हाच तुकारामांचा संदेश आहे.
लेबल: abhang, tukaram