उजळला दीप गुरुकृपा जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लिक्षयेला ठाव श्मशानींचा ॥१॥
रडती रात्रदिवस कामक्रोधमाया । म्हणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥
वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरां जीवित्वेसी ॥२॥
फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य जनीं बोंब जाली ॥३॥
दिली तिळीजुळी कुळनामरूपांसी । शरीर ज्याचें त्यासी समर्पिलें ॥४॥
तुका म्हणे रक्षा जाली आपींआप । उजळला दीप गुरुकृपा ॥५॥
प्रेमात पागल झालेल्या प्रियकराला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी जसे प्रेयसीच दिसते तसे भक्तित बुडालेल्या तुकारामांना अंत्ययात्रा देखील ईश्वराकडे नेणारी भक्तियात्राच वाटली तर नवल नाही. ईश्वराशी तादात्म्य पावल्यामुळे शरीराचा भाव प्रेतरूप झाल्यासारखा, आता आपले हक्काचे झाड गेले म्हणून रडणार्या काम, क्रोध, मायारूपी कैदाशिणी, तर आपला हात साफ करण्याची संधी गेली म्हणून हबकलेला यम! कडक उन्हात वाळलेल्या वैराग्यरूपी शेणी असल्यावर ज्ञानरुपी अग्नि जीवित्वाच्या आसेला आपल्या कवेत किती सहजतेने सामावून घेतो? आशा, आकांक्षेचे घट प्रदक्षिणा करवून एकदा का फोडून टाकले की 'अहं ब्रम्हास्मि' व 'तत्वम् असि' या महावाक्यांची बोंब मारायला मोकळे. कुळ, नाम व रूपाची ही तिलांजली देऊन शरीर ईश्वरास समर्पित केले की मनातल्या ऐहिकतेची रक्षा झालीच म्हणून समजा. आता एका कोपर्यात गुरुकृपेचा दीप जणू काही झालेच नाही, इथे काही नव्हतेच तर होणार काय? अशा थाटात शांतपणे तेवत आहे!