माकडें मुठीं धरिलें फुटाणे माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥
शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥
पुर्वीच्या काळी माकडे पकडण्यासाठी एका मडक्यात काही खाण्याचे पदार्थ टाकून ते जमिनीत पुरुन ठेवत असत. माकडे ते खाण्यासाठी त्यात हात घालत. हाताची मूठ मिटल्यामुळे हात बाहेर निघत नसे व ते पकडले जाई. पण त्या मूर्ख माकडाला हे कळत नसे की आपण जशी मूठ मिटली तशी मूठ उघडली तर आपला हात आपोआप बाहेर येईल! पण त्याला तरी का दोष द्यावा? तो तर शेवटी पशू आहे. (माणसाचे काय?) पोपट पकडण्यासाठी देखील अशीच एक सोपी युक्ती केली जाई. एक नळी तारेला बांधून ठेवत. पोपट त्यावर बसला की ती त्याच्याच वजनाने गोल गोल फिरू लागे. ही नळी सोडली तर आपण खाली पडू या भितीने तो ती नळी घट्ट धरून ठेवी व पकडला जाई. जनसामांन्यांना परिचीत असलेली ही उदाहरणे देऊन तुकारामांनी किती सोप्या पद्धतीने माणसाला "सोडायचा" उपदेश केला आहे?