उजळला दीप गुरुकृपा जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लिक्षयेला ठाव श्मशानींचा ॥१॥
रडती रात्रदिवस कामक्रोधमाया । म्हणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥
वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरां जीवित्वेसी ॥२॥
फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य जनीं बोंब जाली ॥३॥
दिली तिळीजुळी कुळनामरूपांसी । शरीर ज्याचें त्यासी समर्पिलें ॥४॥
तुका म्हणे रक्षा जाली आपींआप । उजळला दीप गुरुकृपा ॥५॥
प्रेमात पागल झालेल्या प्रियकराला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी जसे प्रेयसीच दिसते तसे भक्तित बुडालेल्या तुकारामांना अंत्ययात्रा देखील ईश्वराकडे नेणारी भक्तियात्राच वाटली तर नवल नाही. ईश्वराशी तादात्म्य पावल्यामुळे शरीराचा भाव प्रेतरूप झाल्यासारखा, आता आपले हक्काचे झाड गेले म्हणून रडणार्या काम, क्रोध, मायारूपी कैदाशिणी, तर आपला हात साफ करण्याची संधी गेली म्हणून हबकलेला यम! कडक उन्हात वाळलेल्या वैराग्यरूपी शेणी असल्यावर ज्ञानरुपी अग्नि जीवित्वाच्या आसेला आपल्या कवेत किती सहजतेने सामावून घेतो? आशा, आकांक्षेचे घट प्रदक्षिणा करवून एकदा का फोडून टाकले की 'अहं ब्रम्हास्मि' व 'तत्वम् असि' या महावाक्यांची बोंब मारायला मोकळे. कुळ, नाम व रूपाची ही तिलांजली देऊन शरीर ईश्वरास समर्पित केले की मनातल्या ऐहिकतेची रक्षा झालीच म्हणून समजा. आता एका कोपर्यात गुरुकृपेचा दीप जणू काही झालेच नाही, इथे काही नव्हतेच तर होणार काय? अशा थाटात शांतपणे तेवत आहे!
माकडें मुठीं धरिलें फुटाणे माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥
शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥
पुर्वीच्या काळी माकडे पकडण्यासाठी एका मडक्यात काही खाण्याचे पदार्थ टाकून ते जमिनीत पुरुन ठेवत असत. माकडे ते खाण्यासाठी त्यात हात घालत. हाताची मूठ मिटल्यामुळे हात बाहेर निघत नसे व ते पकडले जाई. पण त्या मूर्ख माकडाला हे कळत नसे की आपण जशी मूठ मिटली तशी मूठ उघडली तर आपला हात आपोआप बाहेर येईल! पण त्याला तरी का दोष द्यावा? तो तर शेवटी पशू आहे. (माणसाचे काय?) पोपट पकडण्यासाठी देखील अशीच एक सोपी युक्ती केली जाई. एक नळी तारेला बांधून ठेवत. पोपट त्यावर बसला की ती त्याच्याच वजनाने गोल गोल फिरू लागे. ही नळी सोडली तर आपण खाली पडू या भितीने तो ती नळी घट्ट धरून ठेवी व पकडला जाई. जनसामांन्यांना परिचीत असलेली ही उदाहरणे देऊन तुकारामांनी किती सोप्या पद्धतीने माणसाला "सोडायचा" उपदेश केला आहे?
तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें तोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥१॥
तोंवरि तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राम्हणा देखिलें नाहीं ॥ध्रु.॥
तोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ॥२॥
तोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाईंचा पुत्र दृष्टी देखिला नाहीं ॥३॥
तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुक्याचें दर्शन जालें नाहीं ॥४॥
जोवर खर्या शक्तीची ओळख होत नाही तोवर कोणीही भाव खाऊन जातो. तसे खर्या संताचे दर्शन होत नाही तोवर माळामुद्रांची चलती असते. वैराग्याच्या आणि शूरत्वाच्या गोष्टी सुंदर स्त्री अथवा पराक्रमी पुरुष भेटेपर्यंतच!